नंदुरबार पालिकेकडून १ मार्चपासून कर वसुलीसाठी धडक मोहीम; कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखणार- माजी आ. चंद्रकांत रघुवंशी
कोरोनाचे संकट आता बऱ्यापैकी निवळले आहे. व्यवसायिक,नोकरदारांचे आर्थिक चक्र पूर्वपदावर आले असून, मालमत्ता व पाणीपट्टी कर थकबाकीदारांनी वेळेत कराचा भरणा करावा. कर वसुलीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ रोखण्यात येईल असा इशारा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिला.
नंदुरबार नगरपालिकेची मालमत्ता व पाणीपट्टी कराची वसुली कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने होऊ शकली नाही. थकबाकीदारांना पालिकेतर्फे वेळोवेळी नोटीस देऊन देखील कराचा भरणा करण्यात येत नसल्यामुळे कोट्यवधींची थकबाकी दिसून येत आहे. पालिकेच्या स्व.भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शनिवार (दि.२६)फेब्रुवारी रोजी दुपारी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे,तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी भाऊसाहेब थोरात, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, बांधकाम सभापती राकेश हासानी,फारुख मेमन,किशोर पाटील उपस्थित होते.
यावेळी माजी आ.रघुवंशी म्हणाले, वसुली विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात न थांबता कर थकीत असलेल्या आपल्या नागरिकांच्या घरी जाऊन वसुली करावी. त्यांना नोटिसा द्याव्यात. नोटिसा दिल्यानंतरही त्यांनी कराचा भरणा न केल्यास घराचे नळ कनेक्शन कट करा. पालिकेची आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने वसुली करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आढावा बैठकीला नगरसेवक,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
थकबाकीदारांच्या घराबाहेर बोर्ड लावा
यावेळी तहसीलदार तथा पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी भाऊसाहेब थोरात म्हणाले, सूचना व नोटीस देऊन सुद्धा मालमत्ता थकवणारे नागरिक कराचा भरणा करीत नसतील तर त्यांच्या घराजवळ कर थकित असल्याच्या बोर्ड लावा जेणेकरून वसुली व्यवस्थित होऊ शकेल. व्यापारी संकुलातील व्यावसायिकांशी कराचा भरणा करण्यासाठी आग्रह करा अशा सूचना त्यांनी दिल्या.
Comments
Post a Comment