मॅक्स बोलेरो गाडी ४० फुट खोल दरीत कोसळल्याने ९ जण जखमी.
शहादा तालुक्यातील नागझीरी गावाजवळ प्रवासी वाहतूक करणारी मॅक्स बोलेरो गाडी खोल दरीत कोसळल्याने कोठबांधणी येथील नऊ जण जखमी झाले असून अपघातात दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने नंदुरबार जल्हिा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर म्हसावद ग्रामीण रूग्णालयात ऊपचार सुरू आहेत.
कोटबांधणी येथून मॅक्स बोलेरो गाडी क्र.एम.एच. ७३८९ ही प्रवासी वाहतूक करणारी गाडी शहादाकडे प्रवासी बसवून आणत असताना नागझीरी गावाजवळ उमरापाणी फाट्यालगत ऊतारावर चालकाचे गाडीवरील ताबा सुटल्याने ४० फुट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार आपल्या कर्मचाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले होते.
सदर अपघातात आबला नानका भील, टेंबलीबाई हेलक्या भील, पाण्या पाणसिंग शिंदे, सोन्या आबल्या भील, वसंतीबाई आबला भील, हिराबाई सोन्या भील, आपसिंग साव-या भील, लाडकीबाई आपसिंग भील, एकट्या अजय भील हे जखमी झाले. पैकी दोन जण गंभीर जखमी असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नंदुरबार जल्हिा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. किरकोळ जखमींवर म्हसावद ग्रामीण रूग्णालयात डॉ. अल्लउद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ऊपचार सुरू आहेत. गाडीचा चालक मंगलसिंग पाण्यासिंग भील रा. केलीखेत, ता.पानसेमल, जि. बडवाणी याच्याविरोधात म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार करीत आहेत.
Comments
Post a Comment