नवापूर तालुक्यात पाऊस व नद्यांना पुरामुळे शाळांना सुट्टी जाहीर. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू.
नवापूर शहरातील रंगावली नदीपात्रातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाणी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या नागरिकांच्या संरक्षणाच्या हेतूने नागरिकांचे स्थलांतर करण्याचे निर्णय नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या प्रशासनाने घेतला आहे. तरी नदीकाठी राहणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपले मौल्यवान सामान, महत्वाचे कागपत्रे, तसेच अन्य महत्वाचे साहित्यांसह सार्वजनिक हॉल, शासकीय विश्रामगृह या ठिकाणी स्थलांतरित व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच आवश्यकतेनुसार नगरपालिका टाऊन हॉल, अग्रवाल भवन आणि हनुमान वाडी या ठिकाणी नागरिकांची सोय करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.
नवापूर तालुका तहसीलदार मंदार कुलकर्णी व शिक्षणाधिकारी यांनी नवापूर तालुक्यातील सर्व शाळा प्रशासन आस्थापनांना सुट्टी देण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. नवापूर तालुक्यात गेल्या चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक गावांचे फरशी पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा जोर कमी होईपर्यंत पुढील आदेशापर्यंत शाळांना सुट्टी राहणार असल्याचे सर्व केंद्रप्रमुखांना तोंडी आदेश देण्यात आले आहे.
नवापूर शहराला लागून असलेल्या रंगावली नदी काठावरील जुने महादेव मंदिर परिसर, राजीव नगर परिसर व देवळफळी परिसरातील साधारण १०० घरातील ४०० व्यक्तीना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येत असल्याची माहिती नवापूर तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. नागरिकांनी नदी - पूर पाहण्यासाठी नदीकिनारी जाऊ नये, आपली सुरक्षितता बाळगावी असे आवाहान तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments
Post a Comment